02 September, 2008

'वहिनी'चा सन्मान - प्रसिद्ध अभिनेत्री सुलोचना यांच्याबद्दल आलेला हा एक लेख

संवाद
'वहिनी'चा सन्मान
[ Saturday, March 16, 2002 11:00:00 pm]


महाराष्ट्राची पताका सीमेपार फडकवणाऱ्या आणि मराठी माणसाची मान उंचावणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना मानाचा मुजरा करण्याची प्रथा ' महाराष्ट्र टाइम्स ' ने गतवषीर् सुरू केली... ' मटा सन्मान संध्ये ' त यंदा प्रसिद्ध अभिनेत्री सुलोचना यांना ' मटा महाराष्ट्रभूषण ' किताब देऊन गौरविण्यात आले. या मानकऱ्याची ही ओळख...

लहानपणी ' वहिनींच्या बांगड्या ' चित्रपट पहिल्यांदा बघितला, तेव्हा त्यातील एक दृश्य बघताना अंगावर उमटलेले रोमांच आजही सुस्पष्ट आठवतात! आईबापाविना विवाहेच्छू दादाचे धाकटे, शाळकरी वयाचे बंधुराज मातेच्या प्रेमाला आसुसलेले आणि स्वत:चा मान राखला जाण्याबाबत अतिशय दक्ष असतात. दादाने परस्पर एक उपवर कन्या पसंत केल्याचे समजताच, चिरंजीव खूप रागावतात. ' वहिनी मीच पसंत करणार ' असा हट्ट धरतात आणि शाळा सुटल्यावर तसेच दफ्तर सोबत घेऊन भावी वहिनीच्या घरी जाऊन थडकतात .खूप रुसलेले असतात- पण ती बाहेर येते ; आदराने त्या आपल्या पोरवयाच्या दीराला विनम्रपणे लवून नमस्कार करते आणि समोर खुरमांडी घालून बसते...

हा विस्मयचकितपणे बघतच राहतो- त्याच्या स्वप्नातील आईच जणू चित्रातून उतरून खाली आली आहे- तीच ती डोळ्यांत तेवणारी सौम्य निरांजनं आणि ओठांच्या कडेवर सांडणारं मायाळू आश्वासक स्मित! झटक्यात हा आपलं दफ्तर उचलतो नि पळू लागतो. ' आपल्याला मुलीला काही प्रश्नबिश्न विचारायचे नाहीत ?'- वधुपिता नवलाने विचारतो, तर तो बालजीव पळता पळताच ओरडतो ,' गरज नाही! पसंत आहे मुलगी! ' तेव्हा, ती उपवर तरुणी खुदकन इतकं गोड हसते की, सर्व प्रेक्षकांनाही वाटतं, आपल्यालाही अशीच गोडगोजिरी वहिनी मिळेल तर काय बहार होईल ?

ही वहिनी होती अभिनेत्री सुलोचना! आजच्या मराठी/हिंदी चित्रपटसृष्टीची आदरणीय दीदी! आज 73 वर्षांच्या आयुष्यात असामान्य अभिनय कौशल्याबद्दल मराठी माणसाला सहजासहजी न लाभणारे अनेक पुरस्कार त्यांच्याकडे चालत आले आहेत. ताज्या महाराष्ट्रभूषण पुरस्काराने या साऱ्या सन्मानांवर सरताज चढला आहे...

हे सारे सन्मान आहेत ते कठोर कष्टांनी जन्मजात अंगभूत दोषांवर मात करून जिद्दीने अलौकिक यश संपादन करण्याच्या दीदींच्या विजिगीषेला मानाचा मुजरा करण्यासाठी!...

कोल्हापूरजवळील खडकलाट या लहानशा गावात फौजदार शंकरराव दिवाण व त्यांची पत्नी तानीबाई यांच्या पोटी 30 जुलै 1929 रोजी, अक्क ामावशीच्या नवसाने जन्माला आलेल्या दीदींचा जन्म तिथीने नागपंचमीचा! म्हणून सगळे त्या लहानुलीला नगाबाईच म्हणत असत. तीन/चार वर्षांची असताना नागपंचमीलाच तिच्याभोवती फेर धरून नाचणाऱ्या आयाबायांनी/पोरीटोरींनी तिला रंगू म्हणून हाक मारायला सुरुवात केली आणि मग ती साऱ्या गावाची रंगूबाईच होऊन बसली. लाडाकोडात वाढलेल्या रंगूला मराठी चौथ्या इयत्तेपलीकडचे शिक्षण पुढे लग्न जुळायला त्रास होईल, या विचाराने प्रेमळ पण जुन्या वळणाच्या मावशीने घेऊ दिले नाही. या हिशेबाने ही अल्पशिक्षित रंगूबाई लग्नानंतर खडकलाटच्या एखाद्या घरात घरवाली बनूनच राहायला हवी होती.

पण विधिलिखित वेगळंच होतं! त्यांचा विवाह आबासाहेब चव्हाण यांच्याशी झाला. वडील शंकरराव यांच्याप्रमाणेच पती आबासाहेब यांचीही इच्छा देखण्या रंगूताईंनी चित्रपटसृष्टीत नावलौकिक कमवावा, अशीच होती. आबासाहेब त्यांना आपले मित्र भालजी पेंढारकर यांच्या प्रभाकर स्टुडिओत घेऊन गेले आणि रंगूताईंची ललाटरेषा एकदम फळफळली. दिग्दर्शक भालजी तिचे बाबाच बनले आणि त्यांची अभिनेत्रीपत्नी लीलाबाई माई! या गुरूने व गुरूपत्नीने रंगूताईंचा आत्मविश्वास जोपासला ; ' करीन ती पूर्व ' या नाटकात काम करायला लावलं ; आणि या नाटकाच्या वेळीच या भावपूर्ण विशालाक्षीचं नामांतर बाबांनी ' सुलोचना ' असं करून टाकलं! सासुरवास, जयभवानीमध्ये दुय्यम कामं केलेल्या सुलोचनाने प्रकृती बरी नसतानाही ' मीठभाकर ' मधली पारूची मध्यवतीर् भूमिका अप्रतिम साकारली ; पण दुदैर्वाने 1948 साली गांधीहत्येनंतर झालेल्या जाळपोळीत प्रभाकर स्टुडिओसह त्या चित्रपटाची रीळेही बेचिराख झाली आणि बाईंसमोर पुन्हा निराशेचा अंध:कार पसरला.

चंबुगबाळं आवरून पुन्हा खडकलाटला परतायच्या तयारीत असतानाच , ' सासुरवास ' मध्ये त्यांच्यासोबत काम करणारे मा. विठ्ठल भावाच्या मायेने घरी धावून आले आणि कानउघाडणी करून पुण्याला मंगल चित्रच्या स्टुडिओत जायला त्यांनी फर्मावले. तिथे गेल्याबरोबर राजाभाऊ परांजपे यांनी सुलोचनाबाईंना मुळी ' जिवाचा सखा ' च्या नायिकेचीच भूमिका दिली. ती गाजली आणि सुलोचना या नावाचा दबदबा पुण्याच्या चित्रसृष्टीत निर्माण झाला. तिकडे कोल्हापुरात बाबांनी पुन्हा जिद्दीने नवा जयप्रभा स्टुडिओ उभारून ' मीठभाकर ' ची निमिर्ती सुलोचनाबाईंना घेऊन केली आणि बाईंकडे चित्रपटांची रांगच लागली.

त्यांची खरी कसोटी लागली ती ' बाळा जो जो रे ' या चित्रपटातील नायकाच्या विधवा ब्राह्माण बहिणीचं काम करताना! त्यांची वाणी अशुद्ध, गावंढळ. त्या हे काम काय करू शकणार ? असे मांडे त्यांचे हितशत्रू मनात खात होते. पण मेहनतपूर्वक आपली वाणी सुधारून ती भूमिका यशस्वीपणे करून बाईंनी टीकाकारांना चोख उत्तर दिलं. ' पारिजातक ' चित्रपटातील सत्यभामेच्या तोंडचे संस्कृतप्रचुर संवाद नीट उच्चारता यावेत, यासाठी बाबांच्या सल्ल्यानुसार भल्या पहाटे उठून संस्कृत श्ाोक मोठमोठ्याने घोकायला त्यांनी प्रारंभ केला ; मराठीतील कमावलेल्या शुद्ध भाषेची निवडक पुस्तकं वाचायला सुरुवात केली. त्या मेहनतीमुळे सदाशिवराव कवी यांचा ' वहिनींच्या बांगड्या ' हा चित्रपटही त्यांनी असा काही पेलून नेला की, केवळ ग्रामीण चित्रपटांचीच नायिका हा स्वत:वरला ठसा त्यांनी पार पुसून टाकला. अनेक चित्रपटांचे करार पर्समध्ये ठेवून चित्रीकरणासाठी कोल्हापूर, पुणे, मुंबई करणाऱ्या सुलोचनाबाई 1954 साली मुंबईत स्थिरावल्या आणि ' स्त्री जन्मा ही तुझी कहाणी ' च्या ' औरत ये तेरी कहानी ' या हिंदी रूपांतरातील आक्काच्या मध्यवतीर् भूमिकेच्या निमित्ताने त्यांचा हिंदी चित्रपटसृष्टीत खऱ्या अर्थाने प्रवेश झाला. तेव्हा बंद खोलीत लता मंगेशकरची गाणी रेकॉर्डवर गाऊन दीदींनी आपले हिंदी उच्चारण निदोर्ष केलं. पण त्यांना तिथे नायिकेच्या भूमिका मिळणे शक्य नव्हतं ; तेव्हा ललिता पवार या मैत्रिणीने, प्रमुख भूमिकांचा नाद सोडून चरित्रभूमिका स्वीकारण्याचा व्यवहार्य सल्ला बाईंना दिला. बाईंनी तो शिरोधार्य मानला आणि मराठी चित्रपटांतील ही वहिनी/दीदी हिंदी चित्रपटांतील एक देखणी माता बनली. धमेर्ंद, शशी कपूर, मनोज कुमार, सुनील दत्त हे त्यांचे ' मुलगे ' आजही दीदी सामोऱ्या आल्या की, त्यांना लवून नमस्कार करतात ; ' अशी आई मिळायला भाग्य असावं लागतं ' म्हणतात!

हा मान मिळतो, तो दीदींच्या अभिजात अभिनयसार्मथ्यामुळे! त्या मुळी प्रत्येक लहानमोठी भूमिका करतानाही ती साक्षात् जगतातच! त्यांच्या सोज्वळ रूपाला साजेशाच सात्विक, सदाचारी प्रवृत्तीच्या भूमिका त्या सतत स्वीकारत राहिल्या. आपला अभिनय कसाला लावायला ' भाऊबीज ' मधल्या मैना या उठवळ तमासगिरिणीची भूमिका किंवा ' तारका ' मधील उच्छृंखल अभिनेत्रीची भूमिका मध्ये त्यांनी स्वीकारली, तर त्यांच्या चाहत्यांनी निषेधपत्रं पाठवून ' पुनश्च अशा भूमिका करू नका ' म्हणून बजावलं. त्यामुळे आपल्या चाहत्यांच्या भावनेची कदर करण्यासाठी एकाच प्रकारच्या सात्विक भूमिका दीदी स्वीकारत राहिल्या ; तरी त्यांच्या अभिनयातील उत्स्फूर्ततेमुळे त्या भूमिकाही एकसुरी न होता, प्रेक्षकांना रिझवत राहिल्या!

आजतागायत सुलोचनादीदींनी अडीचशे हिंदी व दीडशे मराठी चित्रपटांतून कामे केली आहेत. ' बंदिनी ', ' चाळ नावाची वाचाळ वस्ती ' या दोन गाजलेल्या चित्रवाणी मालिकांनंतर गतवषीर् सचिनसह ' कुणासाठी कुणीतरी ' या तिसऱ्या मालिकेत त्यांनी काम केलं आहे.

सुलोचनादीदींची ' फॅन मेल ' आजही मोठी आहे. देव्हाऱ्यातल्या सोज्वळ नंदादीपासारखं व्यक्तिमत्त्व असलेल्या दीदींना या असंख्य पत्रांतून सात्त्विक प्रेमच मिळतं. सांगलीचे सुधाकर गुर्जर हे बंधुतुल्य चाहते दीदींच्या साठाव्या वाढदिवसापासून त्यांचा प्रत्येक वाढदिवस मोठाले पेढे वाढत्या संख्येने त्यांना भेट पाठवून आठवणीने साजरा करतात! पूना गेस्ट हाऊसचे चारुदत्त सरपोतदार असेच भावाच्या मायेने प्रत्येक सुखदु:खाच्या क्षणी पाठीशी उभे असतात. कुणी चाहती मातेच्या ममतेने स्वत: बनवलेलं लिंबाचं लोणचं भेट पाठवते! पाणावलेल्या डोळ्यांनी त्या भेटी स्वीकारताना दीदींना आठवत असतात ते देव्हाऱ्यातले पूजेत ठेवलेले नऊ आणे- त्यांच्या ' सांगत्ये ऐका ' चा सुवर्ण महोत्सव पुण्याच्या विजयानंद चित्रपटगृहात साजरा होत असताना काठी टेकत टेकत येऊन ती आपली दिवसभराची कमाई त्यांना पाठवून देणाऱ्या भोळ्या भिकाऱ्याच्या रूपाने मिळालेला जनताजनार्दनाचा तो महान प्रसाद!

स्वत: दीदींची दानतही विलक्षणच आहे. प्रभादेवीच्या प्रभा नगरमधील त्यांच्या राहत्या घरातील दिवाणाखाली एक ट्रंक नेहमी साड्यांनी भरलेली असते. मराठी चित्रसृष्टीतील जवळजवळ प्रत्येक प्रथितयश तसेच नवोदित अभिनेत्रीला दीदींकडून साडीची भेट मिळालेली असते आणि त्या आशीर्वादामुळेच आपला उत्कर्ष झाला, अशी त्यापैकी प्रत्येकीची भावना असते. त्यांना पुरणपोळी आवडते, म्हणून कुणी वाढदिवसाला त्यांना पुरणपोळ्या भेट घेऊन गेलं, तर दीदी चांदीच्या आकर्षक भेटवस्तू निघताना हातात कोंबणार! रस्त्यावरले निराधार भिकारी, पडद्यामागचे छोटे कलावंत यांना तर मदत सुरू असतेच ; पण प्रत्येक राष्ट्रीय आपत्तीत पहिली देणगी दीदींची असते, कारण ' देव देश अन् धर्मापायी, प्राण घेतलं हाती ' चा संदेश देणाऱ्या भालजींच्या संस्कारांच्या मुशीतून त्या घडल्या आहेत. म्हणूनच भारत-चीन युद्धाच्या वेळी रक्तदान करायला जशा त्या धावल्या, तशाच संरक्षण निधीसाठी सुवर्णदानाचे आवाहन होताच आपल्या घरातील दिवंगत वहिनीचे, स्वत:चे व कांचनचेही सारे सुवर्णालंकार वेटाळून महाराष्ट्राचे तेव्हाचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हाती सुपूर्द करायला धावल्या! 1960 साली हृदयनाथ मंगेशकरांनी काढलेला ' भाव तेथे देव ' हा चित्रपट तिकिट खिडकीवर साफ कोसळला, तर सुलोचनादीदींनी त्या चित्रपटातील आपल्या कामाबद्दल एका पैचाही मोबदला ह्रदयनाथकडून घेतला नाही! निगवीर्, मनमोकळ्या स्वभावामुळे आणि साध्या राहणीमुळे मराठी चित्रसृष्टीतील तंत्रज्ञ / कलाकारांपासून सर्वसामान्य मराठी रसिक प्रेक्षकांपर्यंत प्रत्येकजण त्यांच्याकडे अतिशय आदराने बघतो ; त्यांना आपल्याच घरातील मानतो आणि देवाला एकच प्रार्थना करीत राहतो- ' हे ईश्वरा, आमच्या दीदींना शतायुषी कर आणि भारतीय चित्रसृष्टीतील सवोर्च्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना लवकरच लाभू दे! '

[Source : http://www.cfilt.iitb.ac.in/~corpus/consortia/marathi/general/mata/37331/3979091.cms.txt]